जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन (जे.एफ.पी.आर.)

"महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे"

गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) या प्रकल्पाअंतर्गत आशियाई विकास बैंकेकडून महाराष्ट्रास एकूण $ 1.88 मिलीयन (अंदाजे रक्कम रू. 10 कोटी ) एवढा निधी प्राप्त होणार आहे. प्रकल्पाचा कालावधी हा तीन वर्षाचा असेल. JFPR अंतर्गत AIDIP प्रकल्पामार्फत नाशिक व औरंगाबाद - अमरावती एकात्मिक मुल्य साखळ्यांतर्गत उभारण्यात येणा-या 14 स्पोकमधून एकूण 20000 शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक लहान शेतकरी यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि महिला इ. ना एकत्रित करून त्यांना राज्यामध्ये AIDIP प्रकल्पामार्फत उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक मुल्य साखळ्यांशी व इतर पर्यायी बाजारपेठेंशी जोडून त्यांच्या शेतमालाला जास्त दर मिळवून देणे व त्यांचे जीवनमान उंचावणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पाअंतर्गत नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये AIDIP प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणा-या 14 स्पोकमधून प्रत्येकी 100 शेतकरी गट या प्रमाणे एकूण 1400 शेतकरी गट तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक शेतकरी गटातून एका शेतक-याची गटप्रमुख म्हणून निवड करण्यात येईल. प्रत्येक शेतकरी गटात किमान 15 फळे व भाजीपाला उत्पादक शेतक-यांचा समावेश असेल. अशाप्रकारे एकूण 20,000 फळे व भाजीपाला उत्पादन शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 1400 शेतकरी गटांपैकी उत्कृष्ट काम करणा-या गटांच्या किमान 3 उत्पादक कंपन्या तयार करण्यात येतील. गट प्रमुखांना तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्थापन कौशल्य, व्यवसाय इ. विषयी सविस्तर प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांच्यामार्फत ते गटातील सर्व शेतक-यांपर्यंत पोहचविण्यात येईल. तसेच शेतकरी गट आणि उत्पादक कंपन्या यांचे खरेदीदारांशी उदा. घाऊक, रिटेलर, निर्यातदार व प्रक्रीयादार यांचेशी दिर्घकालीन सामंजस्य करार करण्यात येतील.
या प्रकल्पाअंतर्गत संबंधित गावातील शेतक-यांचा सर्व्हे करणे, सर्व्हेतील निष्कर्षांनुसार तेथिल शेतक-यांना प्रशिक्षण देण्यासाठीचे मॉडेल तयार करणे, शेतक-यांचे 1400 गट तयार करणे, प्रत्येक गटातून एका शेतक-याची गटप्रमुख म्हणून नेमणुक करणे, गटप्रमुखांना सविस्तर प्रशिक्षण देणे, गटांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करणे व त्यांना बाजारपेठेशी जोडणे इ. कामकाजासाठी AIDIP, PMU अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या GIU (Grant Implementation Unit) मार्फत WIPRO व त्यांची भागीदार संस्था Centre for Sustainable Agriculture यांची सल्लागार संस्था म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत खालिल तीन मुख्य घटकांचा समावेश आहे.
1) फळे व भाजीपाला उत्पादक लहान शेतक-यांचे गट आणि उत्पादक कंपन्या तयार करणे -
यामध्ये शेतक-यांचे गट तयार करून त्यांचा कृषिमाल एकत्रित केला जाईल ज्यामुळे त्यांचा विक्रीयोग्य माल वाढेल. विक्रीयोग्य माल जास्त असल्यामुळे त्यांना त्याचा माल विक्रीसाठी फायदा होवू शकेल. तसेच AIDIP प्रकल्पाच्या माध्यमातून खाजगी गुंतवणुकदारांशी चांगला बाजारभाव मिळण्यासाठी करार करता येवू शकेल.
2) शेतक-यांची क्षमता बांधणी - बाजारपेठेतील मागणीनुसार दर्जेदार माल उत्पादन करून जास्तीत जास्त दर मिळविण्यासाठी गटामधील शेतक-यांना उत्पादन, गुणवत्ता, मुल्य वृद्धीच्या दृष्टीने काढणीपश्चात हाताळणी, व्यवसाय व्यवस्थापन कौशल्य, संस्थात्मक व्यवस्थापन कौशल्य इ. विषयी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी शेतक-यांनी यशस्वीरित्या शेतकरी गट व उत्पादक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत त्याठिकाणी शेतक-यांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतील.
3) शेतकरी व खरेदीदार यांच्यामध्ये सामंजस्य करार - पारंपारिक बाजार व्यवस्थेच्या बाहेर जावून शेतकरी व खरेदीदार दोघांच्याही हिताचा विचार करून त्यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात येतील.